सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले; नाईलाजाने निवडणुकीला सामोरे जाणार – डॉ. अनिकेत देशमुख
बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न निष्फळ; निवडणुकीला सामोरे जाणार
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची
निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न
केले. आमच्या क्षमतेनुसार जागांची मागणी करून चार बैठका घेतल्या; मात्र समोरून कोणताही निरोप आला नाही. जिल्ह्यातील काही मंडळींची मानसिकता
नसल्याने बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे नाईलाजाने
निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे, अशी भूमिका खासदार
धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या
नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या वतीने डॉ. अनिकेत देशमुख यांनी
पत्रकार परिषदेत मांडली.
चार बैठका होऊनही समोरून प्रतिसाद नाही
बिनविरोध निवडणुकीसाठी आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक
भूमिका घेतली होती. यासाठी ज्येष्ठ मंडळींचीही तयारी होती. आमच्याकडून प्रयत्न
सुरू होते आणि यासंदर्भात चार बैठका झाल्या. मात्र, आमच्या क्षमतेनुसार जागांची मागणी करूनही
समोरून कोणताही निरोप मिळाला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
संपुष्टात आली, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. आम्हाला
राजकारण करायचे नव्हते, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी
एकत्रितपणे काम करायचे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रणजितसिंह मोहिते-पाटील दोन दिवसांत भूमिका मांडणार
गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार रणजितसिंह
मोहिते-पाटील संयमाने भूमिका मांडत आहेत. आता प्रत्यक्ष निवडणूक लागल्याने बुधवारी
झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण पत्रकार परिषदेत डॉ. अनिकेत देशमुख आणि अमोल शिंदे यांनी
प्रश्नांची उत्तरे देत पॅनलची भूमिका मांडली. पत्रकारांनी रणजितसिंह मोहिते-पाटील
यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी दोन दिवसांत बोलतो,
असे उत्तर दिले.
२२ नोव्हेंबरला शिवस्मारक येथे पॅनलची सभा
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे
यांनी रविवार, २२ नोव्हेंबर रोजी शिवस्मारक येथे
स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलची सभा होणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार
परिषदेला माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवसेना शिंदे
गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना ठाकरे गटाच्या
उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवाजी पाटील, भारत शिंदे, सुरेश पाटील आणि संजय इंगोले उपस्थित
होते.