सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा तिढा कायम; कारखानदारांची ३,१५० रुपयांवरच तयारी, दोन दिवसांची मुदत

ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा नाही; बैठक मध्यरात्रीपर्यंत सुरू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील दरावरून निर्माण झालेला संघर्ष बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही हा तिढा कायम राहिला. कारखानदारांनी प्रतिटन ३ हजार १५० रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास असमर्थता दर्शविल्याने बैठकीत कोणताही अंतिम तोडगा निघू शकला नाही.

कारखानदारांची दोन दिवसांची मुदत मागणी

जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांनी आपापली भूमिका ठामपणे मांडली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता आणि उसाची अपेक्षित वाढ न झाल्यामुळे साखरेचा उतारा कमी मिळत असल्याचा मुद्दा कारखानदारांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रतिटन ३ हजार १५० रुपयांपेक्षा अधिक दर देणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कारखानदारांनी या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली. शेतकरी संघटनेनेही या मुदतीला सहमती दर्शवली आहे. दोन दिवसांनंतर सकाळी पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

दोन दिवस आंदोलन तात्पुरते स्थगित

पालकमंत्री गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी गुरुवारी सकाळी यासंदर्भातील पत्र शेतकरी संघटनेला देणार आहेत. त्यामुळे सध्या दोन दिवसांपुरते शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित राहणार आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

दोन दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत ऊसदराचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या मुदतीत शेतकऱ्यांना अपेक्षित दराबाबत तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे आगामी बैठकीकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांचे लक्ष लागले आहे.