२०१७ मधील नगरसेवकाच्या हत्येचा बदला? राजाभाऊ भिंगे हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

पंढरपूर : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजाभाऊ दत्तात्रय भिंगे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. २०१७ मध्ये मिरज येथे झालेल्या नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी राजाभाऊ भिंगे यांचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून तपासला जात आहे. या प्रकरणात गुजरातमधील अहमदाबाद येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ताब्यातील संशयितांची संख्या पाच झाली आहे.

२०१७ मधील हत्येच्या वादातून बदला घेतल्याचा संशय

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नगरसेवक नामदेव भोईटे आणि राजाभाऊ भिंगे हे एकमेकांचे मित्र होते. मात्र, २०१७ मध्ये मिरज येथे नामदेव भोईटे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राजाभाऊ भिंगे यांना मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली होती. या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी भिंगे यांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. पोलिस या दिशेने तपास करीत आहेत.

शतपावली करताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार

मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ भिंगे जेवणानंतर राहत्या घराजवळ शतपावली करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पंढरपूर शहरातील इसबावी परिसरात ही घटना घडली होती. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गँगवॉरची भीतीही व्यक्त केली जात आहे. हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.

पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात तात्या ऊर्फ प्रवीण देविदास शिंदे (रा. झेंडे गल्ली) याला बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) अटक करण्यात आली. त्यानंतर अनिकेत गवळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्य संशयित वैभव ज्ञानेश्वर फसलकर (रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर), स्वप्नील अहिरे (रा. पंढरपूर) आणि रोहन नागे (रा. हडपसर) हे हत्येनंतर गुजरातमध्ये पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकांनी गुजरातमध्ये जाऊन अहमदाबाद येथून या तिघांना ताब्यात घेतले.

अहमदाबाद न्यायालयीन प्रक्रियेनंतर पंढरपुरात आणणार

या तिघांना अहमदाबाद येथील न्यायालयात हजर करून आवश्यक परवानगी घेतल्यानंतर पंढरपुरात आणण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. हत्या प्रकरणामागील नेमका हेतू, आरोपींची भूमिका आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.