संचार न्यूजच्या बातमीची दखल; छत्रपती शिवाजी महाराज चौकात लवकरच सिटी बस स्टॉप उभारणार

सोलापूर : सोलापूर सिटी बस सेवा सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बस स्टॉप नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची बातमी संचार न्यूज आणि दैनिक संचारने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेऊन चौकात नव्याने सिटी बस स्टॉप उभारण्याबाबत पत्र दिले. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे उपस्थित होते.

प्रवाशांना उन्हात-पावसात बसची प्रतीक्षा

छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक असून, येथून दररोज शेकडो प्रवासी सिटी बसने प्रवास करतात. मात्र, या ठिकाणी बस स्टॉपची सुविधा नसल्याने प्रवाशांना उन्हात आणि पावसात रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

महापौरांकडून सकारात्मक प्रतिसाद

नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी दिलेल्या पत्राला महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लवकरच नव्याने सिटी बस स्टॉप उभारण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिल्याची माहिती नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी दिली. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना लवकरच बस थांब्याची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

संचार न्यूजच्या बातमीची दखल

प्रवाशांची समस्या प्रसारमाध्यमांतून मांडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. आता महापौरांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष बस स्टॉप उभारण्याचे काम लवकर सुरू होण्याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.