‘लग्न कर, नाहीतर फोटो व्हायरल करेन’; धमक्यांना कंटाळून सोलापुरात १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीची आत्महत्या

सोलापूर : ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेन’, अशी धमकी देत सतत लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप असलेल्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) रात्री तरुणीने घरी गळफास घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मंदरूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

लग्नासाठी दबाव आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी घरी एकटी असताना रविकांत महादेव सुरवसे हा तिच्या घरी येत असे. ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करतो’, अशी धमकी देत तो तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे तरुणी मानसिक तणावाखाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल

मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) रात्री तरुणीने राहत्या घरी गळफास घेतला. नातेवाइकांनी तिला रात्री सुमारे ९ वाजता सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर तरुणीच्या वडिलांनी सिव्हिल पोलीस चौकीत फिर्याद नोंदवली. त्यानुसार मंदरूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन संशयितांना अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणात रविकांत महादेव सुरवसे आणि सिद्धराम उर्फ सिद्धराय सुरवसे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, हे दोघे सख्खे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे-पाटील यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली. दोन्ही संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची प्राथमिक माहितीही त्यांनी दिली.

एकुलत्या एका मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा

मृत तरुणी डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाची असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. २९ ऑक्टोबर रोजीच तिचा वाढदिवस झाला होता. तिच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. एकुलत्या एका मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.