राज्यातील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलचरणी साकडे
पंढरपूर : राज्यातील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा आणि
सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात
त्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील
सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे हे मानाचे वारकरी म्हणून
सहभागी झाले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम
महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार
समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी
परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी
झाल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या
परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी
सांगितले. दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील
आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री
शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. दिवाळीच्या काळात
शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी
परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले.
व्हीआयपी दर्शन बंद केल्याने वारकऱ्यांना दिलासा
कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. सर्वसामान्य वारकऱ्यांना सुलभतेने आणि कमी वेळेत दर्शन मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाला असून, भाविकांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. यात्रेच्या नियोजनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला होता. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याचे सांगत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
दर्शन मंडपासाठी २५ कोटींचा अतिरिक्त निधी
आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध
करून दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. आवश्यक
सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन
मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत
तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पंढरपूर कॉरिडॉरचे
काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
कार्तिकी यात्रेच्या नियोजनात उत्कृष्ट सुविधा उपलब्ध
करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी
अधिकारी श्रीकांत यादव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,
मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन
लंगुटे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्या कामाचे कौतुक केले.
या अधिकाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नांदेडच्या सुधाकर शिंदे दाम्पत्याला मानाचा वारकरी
होण्याचा सन्मान
कार्तिकी यात्रा २०२६ च्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांची निवड झाली. शिंदे दाम्पत्य गेल्या ११ वर्षांपासून नियमित वारी करत आहे. तसेच हे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून माळकरी असून, शेती व्यवसाय सांभाळत वारकरी संप्रदायाची परंपरा भक्तिभावाने जपत आहे. श्री. सागर महाराज वाशिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते वारकरी परंपरेशी जोडलेले आहेत.
एसटीचा वर्षभर मोफत प्रवास पास प्रदान
शासकीय महापूजेच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर शिंदे व त्यांच्या पत्नी
प्रणिता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्यात आली. यावेळी
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा श्री
विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी
महामंडळातर्फे वर्षभराचा मोफत प्रवास पास प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,
खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव,
आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन
आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्या 'दैनंदिनी २०२७' चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी
केले, तर आभार कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मानले.
विठ्ठलचरणी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रार्थना
राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा आणि बळीराजासह सर्वसामान्यांच्या जीवनात सुख-समाधानाचे
दिवस यावेत, अशी प्रार्थना केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी यावेळी सांगितले.