कोमलच्या कुटुंबीयांचा शुभमसोबतच्या प्रेमसंबंधांचा दावा फेटाळला; गर्ल्स PG मध्ये रात्री तरुणाच्या प्रवेशावर प्रश्न

पुणे : हिंजवडी येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर कोमल राजेंद्र डहाके (वय २७) हिच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. कोमलचे आरोपी शुभम काळबांडे (वय ३०) याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांची संमती होती, असा दावा यापूर्वी समोर आला होता. मात्र, कोमलच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळला आहे. खुनाच्या घटनेनंतरच शुभम हे नाव पहिल्यांदा ऐकल्याचे त्यांनी म्हटले आहे. साखरेवस्ती येथील प्रिस्टीन पेइंग गेस्ट (PG) निवासस्थानी सोमवारी रात्री सुमारे एक वाजता ही घटना घडली. दोघांमध्ये झालेल्या वादातून कोमलची हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी आरोपी शुभम काळबांडे याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘शुभम हे नाव पहिल्यांदाच ऐकले’

कोमलच्या कुटुंबीयांनी तिचे आणि शुभमचे प्रेमसंबंध असल्याच्या वृत्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या घटनेनंतरच त्यांनी शुभम हे नाव ऐकले. दोघांच्या लग्नाचे नियोजन सुरू होते किंवा त्यांच्या संबंधांची माहिती कुटुंबीयांना होती, या दाव्याचाही त्यांनी नकार दिला आहे.

गर्ल्स PG मध्ये रात्री तरुणाला प्रवेश कसा?

महिलांसाठी असलेल्या PG निवासस्थानी रात्री एक वाजता पुरुषाला प्रवेश कसा देण्यात आला, असा सवाल कोमलच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. नातेवाईक अक्षय इंगोले यांनी PG मालकाला याबाबत जाब विचारला आहे. PG मध्ये शंभरहून अधिक मुली राहत असताना घटनेच्या वेळी कोणालाही आवाज कसा ऐकू आला नाही, तसेच सीसीटीव्हीमध्ये काय नोंद झाले आहे, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

PG मालकावर कारवाईची मागणी

या प्रकरणात PG मालकावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल करत अक्षय इंगोले यांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी PG व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच, कोमल हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

इतर तरुणींशी बोलण्यावरून वाद झाल्याचा पोलिसांचा दावा

पोलीस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या माहितीनुसार, आरोपी शुभमला भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने इतर तरुणींशी बोलण्याच्या कारणावरून कोमलसोबत जोरदार वाद झाल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने कोमलसोबत तीन वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. दोन्ही कुटुंबीयांना या संबंधांची माहिती होती, असेही त्याने पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे. या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून दोन्ही कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.