पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच परिसर रिकामा
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात पुन्हा एकदा
बॉम्बच्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याचा धमकीचा ई-मेल
प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून
संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. या घटनेमुळे वकील, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धमकीचा ई-मेल मिळताच न्यायालय परिसर रिकामा
धमकीची माहिती मिळताच न्यायालयातील वकील आणि इतर
कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसर
रिकामा करण्यात आला. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीही मिळाली होती धमकी
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वीही शिवाजीनगर
न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता.
त्यावेळीही खबरदारी म्हणून न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला होता. आता पुन्हा
अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल आल्याने न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला
आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा धमकी
दरम्यान, शिवाजीनगर न्यायालय परिसरात नुकतीच
गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता बॉम्बच्या धमकीचा ई-मेल आल्याने पुणे
शहरात खळबळ उडाली आहे.
धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, तसेच न्यायालय परिसरात कोणती संशयास्पद वस्तू आढळली आहे का, याबाबत अधिकृत तपासाची माहिती अद्याप समोर आलेली नाही.