जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा भडकवण्याचा कट? पाकिस्तानातून ३० जणांचे नेटवर्क सक्रिय असल्याचा डीजीपींचा खुलासा
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये
दहशतवाद पुन्हा भडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर खुलासा राज्याचे पोलीस
महासंचालक (डीजीपी) नलिन प्रभात यांनी केला आहे. १९९१ ते २००३ या कालावधीत रियासी
जिल्ह्यातील महोर आणि चसाना परिसरातून बेपत्ता झालेले ३० जण पाकिस्तानातून
दहशतवादी नेटवर्क चालवत असल्याची माहिती त्यांनी दिली. हे लोक जम्मू-काश्मीरमध्ये
शस्त्रे, दारुगोळा आणि आर्थिक मदत पाठवून दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू करण्याचा
प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. महोर पोलीस ठाण्याला विश्वसनीय सूत्रांकडून याबाबत
माहिती मिळाली होती. संबंधित ३० जण शस्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेले असून
भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी
झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हिजबुल मुजाहिदीनसाठी काम करत असल्याचा दावा
डीजीपी नलिन प्रभात यांनी सोशल मीडियावर दिलेल्या
माहितीनुसार, हे कथित दहशतवादी सध्या पाकिस्तानातून
हिजबुल मुजाहिदीन (HM) या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला आर्थिक आणि शस्त्रसामग्रीची मदत पुरवणे, स्थानिक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे
आणि त्यांचे कट्टरतावादीकरण करणे, असे प्रयत्न या
नेटवर्ककडून सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानातून कार्यरत असल्याचा आरोप असलेल्या ३० जणांची
नावे
पोलीस यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून कार्यरत असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींमध्ये शाडोल येथील
मोहम्मद कय्यूम, शजरू येथील मोहम्मद सबदार, खौर येथील गुलाम मोहम्मद आणि गुलाम कादिर, मुश्ताक
अहमद, दादा येथील खुशाल हुसेन, कर्मकथा
येथील अब्दुल मजीद, मोहम्मद रफीक (उर्फ शब्बीर), शब्बीर अहमद आणि मंजूर अहमद यांचा समावेश आहे. तसेच शजरू येथील मखना,
अलाफ दीन आणि गुलाम मोहम्मद (उर्फ गामा), लार
येथील अब्दुल मजीद, सिल्धर येथील मुश्ताक अहमद आणि जमाल दिन,
शडोल येथील मोहम्मद युसूफ खकमत (उर्फ बिलाल), चक्रस
येथील मोहम्मद इक्बाल आणि मोहम्मद अश्रफ, लढ येथील गुलाम
मोहम्मद, शिब्रास येथील अब्दुल हमीद नजर (उर्फ महमूद),
चिकलास येथील तालिब हुसेन, लढ येथील मोहम्मद
रफीक आणि गामी गुज्जर, तुल्ली येथील मोहम्मद रफीक, कुंदरधन येथील मोहम्मद कासिम आणि मोहम्मद रफीक, बालमटकोट
येथील अब्दुल हमीद, बागोदास येथील शब्बीर अहमद आणि हसोते
येथील मोहम्मद अली यांचा समावेश असल्याचे वृत्तात नमूद आहे.
२०२४ मध्ये गुन्हा दाखल; तपासातून पाच जणांची ओळख
या कथित दहशतवादी नेटवर्कविरोधात महोर पोलिसांनी २०२४
मध्ये भारतीय दंड संहिता, स्फोटक पदार्थांशी संबंधित कायदे आणि
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा
दाखल केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि शस्त्रे व
दारुगोळ्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात गेल्याचा संशय असलेल्या पाच जणांची
ओळख पटवली.
या पाच जणांमध्ये महोर तहसीलमधील शाडोल येथील मोहम्मद
कय्यूम (उर्फ अब्दुल कय्यूम), बिदर येथील बशीर अहमद (उर्फ मासूम),
अर्नास तहसीलमधील हुंदर येथील शौकत अली, थुरु
तहसीलमधील खांती येथील मंजूर अहमद (उर्फ मंजूर हुसेन) आणि थुरु येथील इम्तियाज
अहमद यांचा समावेश असल्याचे डीजीपींनी सांगितले.
दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्याचा संशय
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया पुन्हा
सुरू करण्याच्या प्रयत्नांत सहभागी असल्याचा संशय आहे. दहशतवादी कारवायांसाठी निधी
उभारण्याच्या उद्देशाने काहींनी आपली जमीन विकल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे
पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पाकिस्तानातून चालवले
जाणारे कथित नेटवर्क आणि स्थानिक पातळीवरील त्याचे संपर्क याबाबत सुरक्षा यंत्रणा
अधिक माहिती गोळा करत आहेत.