Vivo X500 सिरीज भारतात लाँच; २००MP कॅमेरा आणि ४००mm सुपर झूमची खासियत
सोलापूर, दि. २६ : स्मार्टफोन निर्माता कंपनी
व्हिवोने (Vivo) भारतीय बाजारात आपली नवीन फ्लॅगशिप
स्मार्टफोन सिरीज Vivo X500 अधिकृतपणे लाँच केली आहे. या
सिरीजमध्ये Vivo X500, Vivo X500 Pro आणि Vivo X500
Pro Max या तीन प्रीमियम मॉडेल्सचा समावेश आहे. मोबाईल फोटोग्राफीला
नवी दिशा देण्याच्या उद्देशाने कंपनीने या सिरीजमध्ये २०० मेगापिक्सेलचा ZEISS
टेलिफोटो कॅमेरा आणि ४०० मिमीपर्यंत झूम करण्याची सुविधा दिली आहे.
Vivo X500 सिरीजच्या किमती किती?
Vivo X500 च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी
स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत १,१९,९९९ रुपये आहे. Vivo X500 Pro च्या १२ जीबी रॅम आणि
२५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १,४९,९९९
रुपये ठेवण्यात आली आहे. तर Vivo X500 Pro Max च्या १२ जीबी
रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,६४,९९९ रुपये असून, ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी १,७९,९९९ रुपये मोजावे लागतील. हे स्मार्टफोन ३
डिसेंबरपासून Amazon, Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे वृत्तात नमूद
आहे.
२००MP ZEISS कॅमेरा आणि ४००mm सुपर झूम
Vivo X500 Pro Max मधील २०० मेगापिक्सेलचा ZEISS टेलिफोटो कॅमेरा हे या सिरीजचे प्रमुख आकर्षण आहे. यामध्ये ३.५x ऑप्टिकल झूम देण्यात आला आहे. त्यामुळे दूरवरील वस्तूंचे अधिक स्पष्ट आणि तपशीलवार फोटो काढता येऊ शकतात. कंपनीने या फोनसाठी स्वतंत्र Telephoto Extender Kit देखील सादर केली आहे. या किटमध्ये २००mm आणि ४००mmचे ZEISS टेलिफोटो एक्स्टेंडर लेन्स उपलब्ध आहेत. वन्यजीव, क्रीडा स्पर्धा आणि स्टेज शो यांसारख्या प्रसंगी दूरवरून फोटोग्राफी करण्यासाठी या लेन्स उपयुक्त ठरू शकतात. या एक्स्टेंडर लेन्स स्वतंत्रपणे खरेदी कराव्या लागणार आहेत. २००mm एक्स्टेंडरची किंमत १५,९९९ रुपये, तर ४००mm एक्स्टेंडरची किंमत २७,९९९ रुपये आहे.
दमदार प्रोसेसर आणि १४४Hz डिस्प्ले
परफॉर्मन्सच्या बाबतीतही Vivo X500 सिरीजमध्ये प्रगत तंत्रज्ञान
देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. तिन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा
सेटअप आहे. Vivo X500 Pro Max मध्ये २ नॅनोमीटर
तंत्रज्ञानावर आधारित चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय १४४Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि मोठी बॅटरी यांसारखी वैशिष्ट्येही
देण्यात आली आहेत.
फोटोग्राफीसाठी प्रीमियम पर्याय; किंमत मात्र जास्त
२००MP कॅमेरा आणि एक्स्टेंडर लेन्समुळे Vivo
X500 Pro Max फोटोग्राफीप्रेमींसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. मात्र,
फोनसोबत एक्स्टेंडर लेन्स खरेदी केल्यास एकूण खर्च दोन लाख
रुपयांच्या जवळ पोहोचू शकतो. त्यामुळे प्रगत कॅमेरा तंत्रज्ञान असलेला हा
स्मार्टफोन सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटच्या तुलनेत महागडा ठरण्याची शक्यता आहे.