साउंड बॉक्स बसविण्याच्या बहाण्याने सहा दुकानदारांची फसवणूक; आरोपीला अटक

सोलापूर, दि. २६ : शहरातील लहान दुकानदारांच्या मोबाईल तंत्रज्ञानाविषयी असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा घेत गुगल पे आणि फोन पे साउंड बॉक्स बसविणे, त्यांचे चार्जेस बंद करणे तसेच जुनी कर्ज प्रकरणे मिटविण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल आणि पिन-पासवर्डचा वापर करून ऑनलाइन कर्ज काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

नूरअहमद हुसेन शेखला अटक

नूरअहमद हुसेन शेख (वय ३१, रा. गेंट्याल टॉकीजच्या पाठीमागे, भारतरत्न इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

मोबाईल आणि पिन-पासवर्ड मिळवून ऑनलाइन कर्ज

तक्रारदार राजू शंकर दसशेट्टी यांच्या दुकानात ४ मे २०२५ रोजी आरोपी आला होता. त्याने गुगल पे साउंड बॉक्स बसवून देण्यासह मोबाईलद्वारे वैयक्तिक कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. तक्रारदारांनी कर्जाची गरज नसल्याचे सांगितल्यानंतरही आरोपीने साउंड बॉक्स रजिस्ट्रेशन, चार्जेस बंद करणे आणि जुनी कर्ज प्रकरणे मिटविण्याच्या बहाण्याने त्यांचा मोबाईल आणि पिन-पासवर्ड मिळविला. मे २०२५ ते मे २०२६ या कालावधीत आरोपीने विविध ऑनलाइन फायनान्स अॅप्सवरून २ लाख १२ हजार ४६६ रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यापैकी १ लाख ७६ हजार ७३३ रुपये स्वतःच्या बँक खात्यावर वळते करून घेत फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आणखी पाच दुकानदारांची फसवणूक उघड

आरोपीने ज्या दुकानदारांना गुगल पे आणि फोन पे सेवा दिली होती, त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी आणखी पाच जणांची अशाच पद्धतीने ३ लाख ३९ हजार ७५३ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी गुरुवारी जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि फौजदार मनोज मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. आरोपीने आणखी नागरिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास सोलापूर शहर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.