‘शेतकऱ्यांचा कळवळा नाही, थकीत कर्जवसुली रोखण्यासाठीच खटाटोप’; सचिन कल्याणशेट्टी यांचा रणजितसिंह मोहिते-पाटलांवर आरोप

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना शेतकरी आणि बँकेच्या सभासदांविषयी खरोखर कळवळा नसल्याचा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला. थकीत कर्जवसुलीची प्रक्रिया थांबविण्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू असल्याची टीका करत, निवडणुकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोहिते-पाटलांच्या भूमिकेला कल्याणशेट्टी यांचे प्रत्युत्तर

अकलूज येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेवर सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेसाठी पॅनेल तयार केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आपलीही तयारी असल्याचे स्पष्ट करताना, बिनविरोध निवडणुकीची भूमिका मांडायची, सर्वांना भेटायचे आणि त्यानंतर वेगवेगळे मुद्दे उपस्थित करायचे, हा प्रकार योग्य नसल्याची टीका त्यांनी केली.

बिनविरोध निवडणुकीसाठी एकत्रित प्रयत्नांची भूमिका

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसून प्रयत्न करावेत, असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले. लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये कोणी कोणासाठी काम केले, याचाही विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पक्षनिष्ठेवरूनही अप्रत्यक्ष निशाणा

भाजपमध्ये राहून पक्षासाठी काम करण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी रात्री दुसऱ्या पक्षाचे काम करणाऱ्यांना पक्षात स्थान नसावे, अशी भूमिका कल्याणशेट्टी यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत निष्ठेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांकडून हालचाली सुरू असताना, कल्याणशेट्टी यांच्या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.