सोलापुरात फटाके स्टॉलसाठी जागांचे नियोजन; पुढील वर्षापासून सर्व स्टॉल होम मैदानावर

सोलापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाके विक्री स्टॉलच्या नियोजनाबाबत महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात फटाके स्टॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नागरिकांची सुरक्षितता, अग्निसुरक्षा, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा आणि शासनाच्या नियमांचे पालन यांना प्राधान्य देत स्टॉल उभारणीचे नियोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसारच स्टॉलना परवानगी

वीर सावरकर मैदान आणि चार पुतळ्यांमागील पार्क स्टेडियम येथे उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसारच फटाके स्टॉल उभारण्यास परवानगी दिली जाणार आहे. या ठिकाणी सुरक्षितपणे जितके स्टॉल उभारता येतील, तितक्याच स्टॉलधारकांना जागा देण्यात येईल. उर्वरित स्टॉलधारकांसाठी होम मैदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वीर सावरकर मैदान आणि चार पुतळ्यांच्या परिसरात पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या अधिकृत स्टॉलधारकांची यादी असोसिएशनने महापालिकेला सादर करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. या यादीनुसार आणि उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसार स्टॉलचे नियोजन केले जाणार आहे.

सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

बैठकीत बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी दिवाळीच्या काळात फटाके खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे स्टॉल उभारताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्टॉलमध्ये आवश्यक अंतर ठेवणे, मोकळी जागा उपलब्ध करणे आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना सहज ये-जा करता येईल, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. उपलब्ध जागेपेक्षा अधिक स्टॉल उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे महापौरांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी पुरेसा मार्ग, स्टॉलधारकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि इतर सुरक्षा उपायांबाबतही बैठकीत चर्चा झाली. सर्व नियमांचे पालन झाल्यानंतरच स्टॉल उभारणीस परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

यंदा जुन्या स्टॉलधारकांना प्राधान्य; पुढील वर्षापासून होम मैदानावर व्यवस्था

फटाके विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याचाही विचार बैठकीत करण्यात आला. अनेक विक्रेत्यांनी दिवाळीच्या सुमारे तीन महिने आधीच फटाक्यांचा साठा खरेदी केलेला असल्याने यंदा अचानक स्थलांतर केल्यास त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यंदा उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसार स्टॉलधारकांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

वीर सावरकर मैदान आणि चार पुतळ्यांमागील पार्क स्टेडियम येथे पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या अधिकृत स्टॉलधारकांची नावे असोसिएशनकडून मागविण्यात येणार आहेत. त्यानुसार पात्र स्टॉलधारकांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. उर्वरित विक्रेत्यांसाठी होम मैदानाचा पर्याय राहणार आहे. दरम्यान, पुढील वर्षापासून शहरातील सर्व फटाके विक्री स्टॉल होम मैदानावर स्थलांतरित करण्याबाबत असोसिएशनने सहमती दर्शविली आहे.

बैठकीला पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित

या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडळवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुरी, नगर अभियंता नीलकंठ मठपती आणि अग्निशमन विभागप्रमुख राकेश साळुंखे उपस्थित होते. तसेच फटाके स्टॉल असोसिएशनचे सुनील रसाळे, बसवराज येरटे, गौरव बेंद्रे, अनिल सावंत, सुनील कत्ते, सन्मित्र काटकर, बाळासाहेब दर्गोपाटील, मनोज जगताप, सुरेश चंद्रगुप्ता, माऊली भोजरंगे, गणेश साठे, अंकिता भुजंग आणि गणेश घाडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.