फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा; ॲनिमल राहत संस्थेचे शाळांमधून जनजागृती अभियान
सोलापूर : दिवाळीत फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे पशुपक्षी भयभीत होतात. अनेक
पक्षी घाबरून सैरभैर होतात, तर काही प्राणी आणि पक्ष्यांना गंभीर दुखापती
होण्याची शक्यता असते. फटाक्यांमुळे भाजण्याच्या घटनांसह पर्यावरणाचेही नुकसान
होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या आवाजाचे फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी
करण्याचे आवाहन ॲनिमल राहत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
सोलापूर आणि परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जागरूक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोठ्या आवाजाचे फटाके न फोडण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. फटाक्यांमुळे पशुपक्ष्यांवर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत त्यांच्याप्रती संवेदनशीलता जपण्याचे आवाहन करण्यात आले. ॲनिमल राहत संस्थेचे वरिष्ठ शिक्षणाधिकारी किरण कंठे यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. फटाके फोडण्याऐवजी घर आकर्षक दिवे, पणत्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी सजवून आनंदाने दिवाळी साजरी करावी, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
पशुपक्ष्यांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश
फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे पशुपक्ष्यांमध्ये भीती निर्माण होते. काही पक्षी घाबरून आपल्या घरट्यांपासून दूर जातात. तसेच फटाक्यांमुळे होणारा धूर आणि कचरा पर्यावरणावरही विपरीत परिणाम करतात. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या आवाजाचे फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ॲनिमल राहत सोलापूर आणि पंढरपूर येथील पथकांनी विशेष परिश्रम घेतले.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन
आपत्कालीन परिस्थितीत प्राण्यांना मदतीची आवश्यकता असल्यास नागरिकांनी ॲनिमल राहत सोलापूर व पंढरपूर या संस्थेशी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक: 9552552048, 9552552049