कोजागिरी पौर्णिमेनंतर तुळजाभवानीच्या दर्शनाहून भाविकांचा परतीचा प्रवास; जादा एसटी बसमुळे सोलापुरात वाहतूक कोंडी

सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी गेलेले लाखो भाविक दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने तुळजापूरहून सोलापूरकडे येण्यासाठी विशेष जादा बसेसची व्यवस्था केली आहे. मात्र, या बसेस आणि भाविकांची एकाच वेळी गर्दी झाल्याने सोलापूर शहरातील प्रमुख चौक आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

तुळजापूर-सोलापूर मार्गावर भाविकांची गर्दी

आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील भाविक आपापल्या गावी परतत आहेत. त्यामुळे सोलापूर-तुळजापूर मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाविकांना परतीचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी एसटी महामंडळाकडून शेकडो जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराज चौकात वाहतूक कोंडी

परतीच्या प्रवासासाठी आलेल्या विशेष एसटी बसेस छत्रपती संभाजी महाराज चौक आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थांबवण्यात येत आहेत. एकाच वेळी अनेक बसेस, भाविक आणि खासगी वाहने या भागात जमा झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. खासगी वाहने, रिक्षा आणि एसटी बसेसच्या गर्दीमुळे काही ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. या कोंडीचा फटका नियमित प्रवाशांनाही बसला. वाहनचालक आणि प्रवाशांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. भाविकांची गैरसोय टाळण्याबरोबरच शहरातील नियमित वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. भाविकांची गर्दी आणि जादा बसेसची वर्दळ लक्षात घेता, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.