पत्नीच्या हत्येनंतर पतीचा 'साप चावला' बनाव – दोन दिव्यांग मुलींमुळे उघड झाली हत्या

बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून रंजन दास या पतीने आपल्या पत्नी रिंकी देवी (३४) हिचा गळा दाबून निर्घृण खून केला आणि नंतर ‘साप चावला’ असल्याचे भासवून स्वतःला रुग्णालयात दाखल करून घेतले. पण त्याच्या दोन दिव्यांग मुलींनी केलेल्या खुणांमुळे हे क्रूर सत्य उघड झाले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटना सुल्तानी गावातील ही घटना परसविगहा पोलीस ठाण्यांतर्गत सुल्तानी गावात गुरुवारी रात्री घडली. १२ वर्षांपासूनचा संसार, पाच मुलांची आई असलेल्या रिंकी देवीला तिच्या पतीने घरातच संपवले. मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि मृत महिलेचा भाऊ बबलू कुमार याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुटुंबीयांनी उघड केली कहाणी बबलू कुमार याने सांगितले की, "रंजन दास रोजचा खर्च, खाण्यापिण्यावर भरमसाठ पैसे खर्च करायचा. याला विरोध केल्यामुळे सतत वाद होत असे." काही दिवसांपूर्वी रिंकी माहेरी राहत होती, पण गुरुवारी रंजन तिला पुन्हा घरी घेऊन गेला होता.दोन मुलींनी सांगितलं सत्य रिंकीच्या मृत्यूबद्दल कुटुंबीय संशयात होते. तिच्या दोन अपंग मुलींनी खुणा करून आईचा खून पित्यानेच केला असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता रंजन रुग्णालयात साप चावल्याच्या कारणाने दाखल झाल्याचे समोर आले. पोलिसांची कारवाई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रुग्णालयातून रंजन दासला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, साप चावल्याचे पुरावे आढळले नाहीत, व त्याचा बनाव उघडकीस आला आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून आरोपीवर खून व फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.