घरफोडी व चोरी करणारा सिध्दनाथ बंडगर स्थानबध्द

सोलापूर :- घरफोडी व चोरी करणारा आरोपी सिध्दनाथ उर्फ डेक्या ऊर्फ ढेप्या ऊर्फ डीके गंगाधर बंडगर (वय २१, रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ) याच्यावर एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले आहेत. बंडगर हा मागील काही वर्षापासून सातत्याने चाकू, गुप्ती, लोखंडी रॉड, काठ्या यासारख्या घातक शस्त्राने दुखापत करणे, घरफोडी करणे, मोटारसायकल चोरी करणे, जबरी चोरी, जमाव जमवणे, दगडफेक करणे आणि घातक शस्त्राने धमकाविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने करीत आला आहे. त्याच्या विरुध्द गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. बंडगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, शहरातील सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत. बंडगर बास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत करण्यासाठी २०२३ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्याच्या विरुध्द एमपीडीएचे आदेश दिल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृह, पुणे येथे करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, प्रताप पोमण, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सूरज मुलाणी, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाटगे, पोलीस अंमलदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे.