ड्रुझ समुदायावर हल्ला थांबवा, अन्यथा नष्ट करू – इस्रायली इशारा

मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा चिघळले आहेत. इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस आणि दक्षिण सीरियातील लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला चढवला. या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य सीरियाचे संरक्षण मंत्रालय असल्याचे समजते. स्थानिक नागरिकांना जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले.  हल्ल्यानंतर इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी इशारा दिला की, “जर सीरियाच्या सैन्याने ड्रुझ समुदायावर हल्ले थांबवले नाहीत, तर आम्ही त्यांना नष्ट करू.” दक्षिण सीरियातील सुवेदा शहरात सध्या ड्रुझ लढाऊ गट आणि सरकारी सैन्यात प्रचंड संघर्ष सुरू आहे. ड्रुझ नेत्यांच्या मते, सीरियन सैन्य अल्पसंख्याक ड्रुझ लोकांना निर्दयपणे मारत आहे. यामुळे शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. सीरियन सरकारचा दावा आहे की हा संघर्ष गुन्हेगारी टोळ्यांमुळे आहे, मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि अहवाल या दाव्यांकडे संशयाने पाहत आहेत.

ड्रुझ समुदाय कोण आहे?

ड्रुझ हे अरब वंशाचे एक धार्मिक अल्पसंख्यांक गट आहे, जो ना पारंपरिक इस्लाम ना यहुदी धर्म पाळतो. त्यांचा धर्म हिंदू, बौद्ध आणि गुप्त धार्मिक तत्त्वांचा समावेश असलेला आहे. सीरियात सुमारे ७ लाख, इस्रायलमध्ये १.५ लाख आणि लेबनॉन, जॉर्डन व गोलान हाइट्समध्येही त्यांची लक्षणीय संख्या आहे. विशेष बाब म्हणजे इस्रायलमधील ड्रुझ नागरिक सैन्यात सेवा देतात.

अमेरिकेचा निषेध

स्वेदा शहरातील हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे विशेष दूत टॉम बॅरक म्हणाले, “नागरिकांवरील हल्ले पूर्णपणे अमानवी आहेत. सर्व पक्षांनी युद्धबंदी जाहीर करून अर्थपूर्ण संवाद साधावा.” अमेरिका अल्पसंख्यांकांचे रक्षण आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाईचे आवाहन करत आहे.

UNSCची आपत्कालीन बैठक

सीरियावरील हवाई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) १७ जुलै २०२५ रोजी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सीरियाच्या मिशनने ही बैठक बोलावली असून, अल्जेरिया यास पाठिंबा देत आहे. इस्रायलचे UN मधील राजदूत डॅनन यांनी, “सीरिया सरकार निर्दोष नागरिकांवर अत्याचार करत आहे,” असा आरोप करत UNSCकडून कारवाईची मागणी केली आहे.