अमेरिकेत पुन्हा F-35 क्रॅश; कॅलिफोर्नियातील नेव्हल बेसजवळ अपघात

अमेरिकेच्या नौदलाचं अत्याधुनिक एफ-३५ फायटर जेट कॅलिफोर्नियातील नेव्हल एअर स्टेशन लेमूर जवळ बुधवारी संध्याकाळी कोसळले. अपघातानंतर विमानाने पेट घेतला आणि आकाशात मोठा धूर पसरला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमेरिकन नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, एफ-३५ फायटर जेट ‘स्ट्राइक फायटर स्क्वॉड्रन वीएफ-१२५’ (Rough Raiders) ला नियुक्त केले होते. हा स्क्वॉड्रन मुख्यत्वे पायलट आणि एअरक्रूजचे प्रशिक्षण देतो. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेच्या वेळी पायलटने वेळेवर इजेक्ट केल्याने तो बचावला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायलटची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु जेट पूर्णपणे नष्ट झाले आहे. F-35 सिरीजच्या अपघातांचा इतिहास हे प्रथमच घडलेले नसून याआधीही 28 जानेवारी २०२५ रोजी अलास्का,28 मे २०२४ रोजी न्यू मेक्सिको, आणि १७ सप्टेंबर २०२३ रोजीही F-35B प्रकाराचे फायटर जेट कोसळले होते. विशेष म्हणजे या तिन्ही घटनांमध्येही पायलट सुखरूप बचावले. अमेरिकन नौदल आणि सुरक्षा एजन्सीने या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती नेमली असून एफ-३५च्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.