आशिया पुन्हा तणावात! थायलंड-कंबोडिया सीमेवर झटापट, दोन सैनिक जखमी — युद्धजन्य वातावरण

आंतरराष्ट्रीय :-
जगभरात युध्दसदृश तणाव असताना थायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमेलगत
पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. गुरुवारी (20 जुलै) दोन्ही
देशांच्या सैन्यात चकमक झाली असून किमान दोन सैनिक जखमी झाले आहेत. ही चकमक थायलंडच्या
सुरिन प्रांतातील प्रसात ता मुएन थॉम परिसरात झाली. या भागावर कंबोडियाचा
सार्वभौमत्व दावा आहे. लँड माईनच्या स्फोटानंतर थायलंडने कंबोडियन राजदूताला
देशातून हद्दपार केल्याने तणाव चिघळला होता. त्यानंतर गुरुवारी सीमारेषेजवळ दोन्ही
सैन्यात झटापट झाली. थायलंडच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, कंबोडियन
ड्रोन दिसल्यानंतर पहिला गोळीबार कंबोडियन सैन्याने केला, आणि
त्यानंतर सहा सशस्त्र सैनिक थाई चौकीजवळ आले. याला उत्तर देत थायलंडने कारवाई
केली. या घटनेनंतर कंबोडियाने बँकॉक येथील राजनैतिक अधिकारी माघारी बोलावले,
तर थायलंडकडून सीमावर्ती भागात लष्कराची नव्याने तैनाती करण्यात आली
आहे. मे महिन्याच्या अखेरीसच या भागात तणाव सुरू झाला होता. एका कंबोडियन सैनिकाचा
मृत्यूही यावेळी झाला होता. तेव्हापासून व्यापारवाटाही बंद आहेत आणि सीमेवरील शाळा
देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये
सद्यस्थिती पाहता संपूर्ण युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.