लातूरमध्ये 75 वर्षीय शेतकरी स्वतः नांगर ओढताना; सोनू सूद मदतीला धावले, प्रशासन सक्रिय

लातूर : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातून एक हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे. ७५ वर्षीय अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीने शेतीसाठी स्वतःच औत ओढण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून अनेक नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अंबादास पवार यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. खते, बियाणे, ट्रॅक्टर किंवा बैल घेण्याची ताकद नसल्याने शेती सुरू ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःला औताला जुंपले तर त्यांच्या पत्नीने नांगराची दिशा सांभाळण्याची जबाबदारी घेतली. संचार

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी पुढाकार घेत, “आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं” अशी घोषणा सोशल मीडियावर केली. दरम्यान, लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी पवार कुटुंबाच्या शेतावर भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या कडे कृषी ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले असून त्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. कृषी विभागाकडून त्यांना सवलतीच्या दरात यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, लवकरच १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार असल्याची माहितीही कृषी अधिकाऱ्यांनी दिली. अभिनेता आणि प्रशासनाच्या मदतीमुळे अंबादास पवार यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, कोरडवाहू शेतीवरील अवलंबित्व आणि वाढते खर्च हे या वृद्ध दाम्पत्याचे वास्तव अजूनही कठीण आहे. संचार