लॉर्ड्स कसोटी: रूट–स्टोक्स इंग्लंडला 400 धावांकडे नेणार? भारताला दुसऱ्या दिवशी लवकर बळी मिळवण्याचे आव्हान

लॉर्ड्स (इंग्लंड) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस निर्णायक ठरू शकतो. पहिल्या दिवसाखेर यजमान इंग्लंडने ४ बाद २५१ अशी मजल मारली असून, अनुभवी फलंदाज जो रूट शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्याला दुसऱ्या बाजूने बेन स्टोक्सची साथ लाभली आहे. इंग्लंडचा उद्देश आता ४०० धावांचा टप्पा गाठून भारतावर दडपण निर्माण करण्याचा आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा प्रयत्न इंग्लंडचा डाव ३५०च्या आत गुंडाळण्याचा असेल. मात्रभारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप अपेक्षेनुसार प्रभाव टाकू शकलेले नाहीत. या तिघांमध्ये सातत्याचा अभाव दिसून आला. भारतासाठी एकमेव दिलासादायक बाब म्हणजे अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीची कामगिरी, ज्याने पहिल्या दिवशी दोन झटपट बळी घेत इंग्लंडचा डाव खिळखिळा केला.

🔸 पहिल्या दिवसाची संक्षिप्त झलक

पहिल्या दिवसाचा खेळ दोन्ही संघांसाठी संमिश्र होता, तरी इंग्लंडचा पल्ला अधिक मजबूत वाटला. नितीश रेड्डीने डकेट आणि क्रॉली यांना एका षटकात बाद करत इंग्लंडला हादरवले. त्यानंतर जडेजाने ऑली पोपला बाद केले, तर बुमराहने हॅरी ब्रूकचा बळी घेतला.

इंग्लंडने या डावात ‘अँटी-बॅझबॉलपद्धतीने खेळ करत सावध खेळाचे धोरण स्वीकारले. ३ धावा प्रति षटक या संथ गतीने धावांची जमवाजमव चालू होती, जी मागील काही वर्षांच्या इंग्लंडच्या आक्रमक शैलीपासून वेगळी होती. ऑली पोपने नाबाद रूटसोबत १०० धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला होता, मात्र तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर जडेजाने त्याला तंबूत पाठवले.

🔸 लॉर्ड्सवरील भारताची ऐतिहासिक कामगिरी

भारताने लॉर्ड्सवर आतापर्यंत १९ कसोटी सामने खेळले असून, फक्त ३ सामने जिंकले आहेत. १२ वेळा पराभव, तर ४ सामने अनिर्णित झाले. २०२१ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय नोंदवला होता. यंदा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भारताला वेगवान गोलंदाजीतील ताकद दाखवावी लागणार आहे.