दहीहंडी गोविंदांसाठी आनंदाची बातमी: राज्य सरकारकडून दीड लाख गोविंदांसाठी विमा कवचाची घोषणा
.jpeg)
मुंबई: – दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून गोविंदांना मिळणार्या विमा कवचात मोठी वाढ करण्यात येणार आहे. मागील वर्षी ज्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण मिळत होते, त्याच्या तुलनेत यंदा दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. दहीहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व मंत्री आशिष शेलार यांनी केले. त्यांनी गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून या उत्सवात गोविंदांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्या प्रमाणात अपघातांचा धोका आणि वैद्यकीय गरजाही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, क्रीडा विभागाला विमा संरक्षणात वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते. हा निर्णय घेतल्यास गोविंदांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार असून, त्यांच्या कुटुंबियांनाही आर्थिक दिलासा मिळेल. लवकरच यासंदर्भातील अंमलबजावणीस सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.