बलुच लिबरेशन आर्मीचा दावा : २९ पाकिस्तानी सैनिक ठार
.jpeg)
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील अस्थिरता पुन्हा एकदा वाढली आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या फुटीर गटाने क्वेट्टा आणि कलाट येथे दोन भीषण हल्ले करत एकूण २९ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे हे हल्ले पूर्वनियोजित होते, अशी माहिती BLAकडून देण्यात आली आहे. बीएलएच्या निवेदनानुसार, क्वेट्टामधील हजारी गंजी परिसरात बीएलएच्या 'फतह स्क्वॉड' या युनिटने आयईडी स्फोट घडवून पाकिस्तानी सैन्यदलाची बस उद्ध्वस्त केली. झिरब नावाच्या गुप्तचर युनिटने ही बस कराचीहून क्वेट्टाकडे येत असल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या बसमध्ये काही कव्वाली गायकही प्रवास करत होते, मात्र बीएलएने स्पष्ट केले की, त्यांचा निशाणा केवळ सैन्यदल होता. या हल्ल्यानंतर बीएलएने पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात लढा सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. "जोपर्यंत बलुचिस्तान स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल," असा थेट इशारा या संघटनेने दिला आहे. यापूर्वी मार्च २०२५ मध्येही बीएलएने जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण करून २६ नागरिकांचा बळी घेतला होता. त्यामुळे बीएलएच्या वाढत्या कारवायांनी पाकिस्तान सरकारची चिंता वाढली आहे.