तुळजाभवानी मंदिरातून देवीची तलवार गायब; पुजाऱ्यांचा गंभीर आरोप

तुळजापूर (जिल्हा उस्मानाबाद): महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातून पूजेसाठी वापरली जाणारी आणि अध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी विशेष तलवार खजिन्यातून गायब झाली आहे, असा गंभीर आरोप स्थानिक पुजाऱ्यांनी केला आहे. या तलवारीमध्ये देवीच्या आठ शस्त्रांमधील तत्त्व आणि शक्ती मंत्रोच्चाराने संचारित करण्यात आलेली होती. पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या हस्ते विशेष विधी व होम-हवन करून ही तलवार पूजित करण्यात आली होती.पुजाऱ्यांचा आरोप आहे की ही तलवार मंदिराच्या खजिना खोलीतून गायब झाली असून, ही घटना मंदिर प्रशासन लपवत आहे. या तलवारीस धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक महत्त्व असल्याने तत्काळ देवीच्या चरणी ती परत आणावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. ही घटना समोर येताच तुळजापूर शहरात भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंदिर ट्रस्टच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.