मुंबई पावसाळी अधिवेशनात अनोखं आंदोलन: टॉवेल-बनियान घालून सरकारविरोधात घोषणाबाजी
.jpeg)
मुंबई :
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात विरोधकांनी सरकारला कोंडीत
पकडण्यासाठी अनोखे आंदोलन केले. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी
आमदार निवासातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज
विरोधी पक्षातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक टॉवेल-बनियन
घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे, ठाकरे गटाचे आमदार महेश
सावंत, हारून खान, राष्ट्रवादी
शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड,
काँग्रेसचे सतेज पाटील आदी अनेक नेते या आंदोलनात सहभागी
झाले. या आमदारांनी गायकवाडांचा हातात बॉक्सर घालून दाखवणारे पोस्टर झळकावले होते.
त्यावर “महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा
धिक्कार असो!” असे लिहिले होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी आले. त्यांनी विरोधकांचा हा वेष
पाहून हसत हसत विधान भवनात प्रवेश केला.
प्रकरण नेमके काय?
आमदार गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप
करत आमदार निवासातील कॅन्टीन मॅनेजरला बेदम मारहाण केली होती. बनियन-टॉवेलवर
कॅन्टीनमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि मॅनेजरला कानाखाली मारले. या
घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि सरकारची अडचण वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या
प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान
परिषदेचे सभापती यांच्याकडे कारवाईची शिफारस केली. पोलिसांनी गायकवाड यांच्यावर
अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी देखील गायकवाड यांना वर्तणुकीबाबत समज देत, “नेत्यांनी कार्यकर्ता असल्यासारखेच वागावे, कमी बोला, जास्त काम करा. मला कारवाई करण्यास भाग
पाडू नका,” असा इशारा दिला.