अपघातात ७ जणांचा मृत्यू – वाढदिवसाहून परतताना दुर्दैवी घटना
.jpeg)
नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. दिंडोरी-वणी रोडवर एका अल्टो कारचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही मंडळी नाशिक शहरात आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करून गावाकडे परत जात होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांच्या अल्टो गाडीचा दुचाकीला धडक बसली आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन उलटली. गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने आत अडकलेल्या सातही जणांचा नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत्यू झाला. अल्टो गाडी क्रमांक MH 04 DY 6642 अशी आहे. दरम्यान, दुचाकीवरील दोन तरुण – मंगेश यशवंत कुरघडे आणि अजय जगन्नाथ गोंद हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अतिवेग किंवा अंधार यामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण गावात आणि कुटुंबीयांत शोककळा पसरली आहे. एका आनंदाच्या क्षणानंतर एवढा मोठा दुर्घटनेत बदल होणे हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे.