मोदी–शहा यांच्या राष्ट्रपती भेटींवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. एका दिवसात दोन उच्चस्तरीय नेत्यांची राष्ट्रपतींची भेट ही राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सप्टेंबर महिन्यात देशात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, “पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटले, हीच बातमी आहे. सध्याच्या परिस्थितीत या देशात काहीही घडू शकतं.” त्यांनी असेही सांगितले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वाची बैठक देखील आज पार पडत आहे. या बैठकीतही भविष्यातील राजकीय हालचालींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.” दुबे यांना प्रत्युत्तर याशिवाय, संजय राऊत यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानावरही परखड प्रत्युत्तर दिले. दुबे म्हणाले होते, “मुंबईच्या निर्मितीत उत्तरप्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिकांचे मोठे योगदान आहे.” त्यावर राऊत म्हणाले, “१०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. ते दुबे, मिश्रा किंवा चौबे नव्हते. मुंबई मराठी माणसाच्या रक्तातून मिळाली आहे. बाहेरून आलेले लोक मुंबईत पैसे कमवायला येतात, पण मुंबई ओरबडायला नाही.”