‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे निधन; हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

मुंबई – ‘कांटा लगा’ या सुपरहिट गाण्यामुळे घराघरात ओळख मिळवलेली आणि बिग बॉस १३मधून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे दुःखद निधन झाले आहे. २७ जून रोजी रात्री त्यांना अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मात्र, आयसीयू विभागात नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेफाली यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपासासाठी मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तिच्या निधनाची बातमी मिळताच कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सोशल मीडियावर शेफालीच्या आईचे आणि कुटुंबीयांचे हृदयद्रावक फोटो व्हायरल होत आहेत. कमी वयात मुलीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शेफालीच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर कलाविश्वातील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. गायक मिका सिंगने भावनिक पोस्ट करत लिहिले, “माझी लाडकी स्टार आणि जवळची मैत्रीण आम्हाला सोडून गेली. अजूनही विश्वास बसत नाही. तुझे हसू आणि उत्साह नेहमी लक्षात राहील. ओम शांती.” काही दिवसांपूर्वी शेफालीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेवटची स्टोरी शेअर केली होती. ग्लॅमरस फोटोशूटमधील फोटोला तिने “Baby Bling It On Baby” असे कॅप्शन दिले होते. या शेवटच्या फोटोवर चाहते आता श्रद्धांजली वाहत आहेत.