संवाद कौशल्ये म्हणजे यशाची खरी गुरुकिल्ली – श्री. अभेद कोठाडीया यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सोलापूर:- संगमेश्वर महाविद्यालयाच्या संगणक
शास्त्र विभागातील आय.टी. क्लबच्या वतीने, अमेरिकेतील बोस्टन (यूएसए) येथील American Family Insurance या कंपनीमध्ये Application
Development Engineer म्हणून कार्यरत असलेल्या श्री. अभेद
कोठाडीया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री. कोठाडीया यांनी ‘सोलापूर ते बोस्टन’ या त्यांच्या
प्रेरणादायी प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून दिली.
तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, सकारात्मक मानसिकता व उद्योगक्षेत्रातील अपेक्षा यावर
त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. “गुणांपेक्षा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा असतो,” असे सांगताना त्यांनी संवाद कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित
केले. “अभ्यासक्रमाबरोबर संवाद कौशल्य आत्मसात केल्याने व्यक्ती अधिक प्रभावीपणे
यशाकडे वाटचाल करू शकतो. हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. आजच्या डिजिटल युगात, सोशल नेटवर्किंगचा योग्य वापर करून करिअर घडवता येते, असेही त्यांनी मत मांडले. बीसीए, बी.एस्सी.(ईसीएस) व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी
समसमान संधी उपलब्ध आहेत. खेळांमधून संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, हे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. “कोणत्याही क्षेत्रात
आपण कितीही यशस्वी झालो, तरी आपली नाळ मातृभूमीशी जुळलेली असावी,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. या व्याख्यानातून
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी संस्थेच्या सचिव मा.
ज्योती काडादी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रुचा
साळुंके हिने केले, तर आभारप्रदर्शन कु. फातिमा शेख हिने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगणक शास्त्र विभागप्रमुख
सौ. प्रा. आर. व्ही. हुंडेकरी या होत्या. या प्रसंगी बीबीए विभागप्रमुख डॉ.
अर्जुन चौधरी, आय.टी. क्लब समन्वयक प्रा. बी. एस. बुक्का, प्रा. एस. टी. पाटील, प्रा. व्ही. पी. ताटी, तसेच आय.टी. क्लब प्रेसिडेंट आयुष टेके, व्हाइस प्रेसिडेंट रुचा साळुंके, सिक्रेटरी आदित्य पाटील, इत्यादी उपस्थित होते. सर्व संगणक शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.