वकील संरक्षण कायदा करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार ः अॅड. निकम
.jpeg)
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि. 21 -
वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वकील संरक्षण कायदा करण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विशेष सरकारी वकील व राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार उज्ज्वल निकम यांनी केले.
सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांचा शाल, हार, मानपत्र देऊन भव्य सत्कार बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव यांच्याहस्ते सोमवारी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये करण्यात आला. त्यावेळी अॅड. निकम हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र अॅन्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद थोबडे, प्रभारी जिल्हा सरकारी वकील शीतल डोके, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, सचिव अॅड. बसवराज हिंगगिरे, खजिनदार एड. अरविंद देडे, सहसचिव अॅड. मीरा प्रसाद यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अॅड. जाधव यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना अॅड. निकम यांची राज्यसभेवर होणारी खासदार पदाची नियुक्ती म्हणजे न्यायक्षेत्राचा गौरव असल्याचे सांगून त्यांनी वकील संरक्षण कायदा पारित करण्याची मागणी करणारे निवेदन बार असोसिएशनच्यावतीने अॅड. निकम यांना दिले.
अॅड. निकम यांचा परिचय अॅड. रियाज शेख यांनी करताना त्यांचा कार्याचा आढावा घेत त्यांनी हाताळलेल्या दहशतवादविरोधी खटल्यांसह जन्मठेप ते मृत्युदंडापर्यंतच्या महत्त्वाच्या न्याय यशाची माहिती दिली. यावेळी खजिनदार अॅड. अरविंद देडे यांनी मानपत्राचे वाचन केले, ज्यात निकम यांच्या न्यायक्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. राजेंद्र फटाटे यांनी अॅड. निकम यांच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या. सहसचिव मीरा प्रसाद यांनी आभार मानले.