विधानभवनात राडा: आमदारांचे समर्थक आमनेसामने, नताशा आव्हाडचा संताप

मुंबई | १७ जुलै २०२५
महाराष्ट्र विधानसभेच्या पवित्र परिसरात चक्क गावगुंडगिरी आणि हाणामारीचा तमाशा पाहायला मिळाला. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच राडा झाला. एकमेकांच्या कॉलरला धरून शिवीगाळ आणि कपडे फाडण्यापर्यंत प्रकार गेल्याने विधानभवनाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सामान्य जनतेमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

वादाचे मूळ

गत आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना अप्रत्यक्षपणे "मंगळसूत्र चोर" असे म्हणत टोकाची टीका केली होती. या टीकेमुळे दोघांमधील वैमनस्य तीव्र झाले. बुधवारी सायंकाळी ५:३० वाजता, विधानभवनाच्या तळमजल्यावर दोघांचे समर्थक भिडले. आव्हाड समर्थक नितीन देशमुख व पडळकर समर्थक हृषीकेश टकले यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली आणि काही क्षणांतच हाणामारीत रूपांतर झाले. टकलेने देशमुख यांच्या कॉलरला धरून मारहाण केली, तर देशमुख यांनीही प्रतिउत्तर दिले. सुरक्षा रक्षकांनी दोघांना ताब्यात घेतले.

 

नताशा आव्हाडचा संताप

या घटनेवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीने, नताशा आव्हाडने, तिच्याविरोधात सोशल मीडियावर चाललेल्या आक्षेपार्ह पोस्ट्सबद्दल संताप व्यक्त केला. तिने लिहिले, "जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे! माझा यात काहीही संबंध नाही, तरी मला ओढले जाते.  तुम्ही मजा पाहत राहा फक्त!" सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप हृषीकेश टकलेला घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तंबाखू मळून दिल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. या आरोपामुळे सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हृषीकेश टकले कोण आहे? हृषीकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले हा शिव मल्हार क्रांती सेनेचा सांगली जिल्हाध्यक्ष असून, त्याच्यावर २०१६ ते २०२१ दरम्यान ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गतही कारवाई झाल्याचे समोर आले आहे.

राजकीय प्रतिष्ठा धोक्यात

ही घटना विधानभवनाच्या इतिहासातील सर्वात लज्जास्पद प्रकारांपैकी एक ठरली आहे. कायदे बनवणाऱ्या ठिकाणी गावगुंडासारखे वागणे, शिवीगाळ आणि हिंसा – यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. नताशा आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या पोस्ट्सवर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.