IND vs ENG दुसरी कसोटी: सिराज-आकाश दीपच्या घातक माऱ्यात इंग्लंडचा डाव कोसळला; भारताला १८० धावांची आघाडी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी भेदक कामगिरी करत इंग्लंडचा डाव ४०७ धावांत गुंडाळला. भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या होत्या, त्यामुळे यजमान संघापेक्षा भारताला 180 धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ७७/३ धावसंख्येपासून खेळाला सुरुवात केली. मोहम्मद सिराजने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात जो रूट (२२) आणि कर्णधार बेन स्टोक्सला शून्यावर बाद करत इंग्लंडला मोठा झटका दिला. यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी ३०३ धावांची ऐतिहासिक भागीदारी करत इंग्लंडला सावरले. ब्रूकने 158 धावा केल्या, तर स्मिथने नाबाद १८१ धावा केल्या. मात्र तिसऱ्या सत्रात आकाश दीपने ब्रूकला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा कोसळला. सिराजने कार्स, टंग आणि बशीर या तिघांना खातेही उघडू दिले नाही. सिराजने एकूण ६ विकेट्स घेतल्या, तर आकाश दीपच्या खात्यात ४ विकेट्स जमा झाल्या.