बांगलादेश हवाई दलाच्या प्रशिक्षण विमानाचा अपघात: ढाकातील कॉलेज परिसरात कोसळल्याने 1 मृत्यू, अनेक जखमी

ढाका (बांगलादेश):
बांगलादेश एअर फोर्सचे एक F-7 प्रकारचे प्रशिक्षण विमान आज दुपारी राजधानी
ढाका येथील उत्तरा परिसरात कोसळले. हे विमान माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा कॅम्पसजवळ दुर्घटनाग्रस्त झाले असून, या अपघातात किमान एक व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या
अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओजमध्ये कॉलेज परिसरातून घनदाट धुराचे लोट उठताना दिसून येत आहेत. बांगलादेश लष्कराचे जवान, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षणाच्या आठ तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य वेगात सुरू आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, दुपारी १:18 वाजता अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तीन युनिट्स घटनास्थळी कार्यरत आहेत, तर इतर दोन युनिट्स रस्त्यावर सज्ज आहेत. अपघातात विमानाचा पायलट जखमी झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
काही स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायलटच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.