येमेन किनाऱ्यावर स्थलांतरितांची बोट बुडाली; ६८ ठार, ७४ बेपत्ता

येमेनच्या अबयान प्रांताच्या किनाऱ्याजवळ एक स्थलांतरित
बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बोटीत १५४ स्थलांतरित प्रवासी होते, जे इथिओपियातून सौदी अरेबियामध्ये रोजगाराच्या शोधात निघाले होते. रविवारी
पहाटे एडेनच्या आखातात बोट उलटली. ६८ मृतदेह सापडले असून ७४ लोक अजूनही बेपत्ता
आहेत.
अपघातात केवळ १० जण वाचले, त्यामध्ये नऊ
इथिओपियन आणि एक येमेनी नागरिक आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना (IOM) ने ही घटना अलिकडच्या काळातील सर्वात गंभीर समुद्री स्थलांतर
दुर्घटनांपैकी एक असल्याचे सांगितले आहे. बचाव कार्य सुरू असले तरी बेपत्ता
स्थलांतरितांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इथिओपिया आणि सोमालियासारख्या देशांतील गरिबी, बेरोजगारी, आणि अस्थिरता यामुळे अनेकजण जीव धोक्यात
घालून येमेनमार्गे आखाती देशांकडे स्थलांतर करत आहेत. येमेन स्वतः यादवी युद्धात
अडकलेला असतानाही, अनेकांसाठी हा मार्ग ‘आखरी आशा’ ठरतो.
IOM च्या माहितीनुसार,
- २०२४ मध्ये
आतापर्यंत ६०,०००
स्थलांतरितांनी येमेनमार्गे प्रवास केला
- २०२३ मध्ये ही
संख्या ९७,२००
होती
- २०२३ मध्ये या
मार्गावर ५५८ जणांचा मृत्यू
- गेल्या दशकात २,०८२ स्थलांतरित बेपत्ता
- यामध्ये केवळ बुडून
झालेल्या मृत्यूंची संख्या ६९३ आहे
येमेनमध्ये पोहोचल्यानंतरही या स्थलांतरितांना तुरुंगवास, छळ, आणि अमानुष परिस्थितींना सामोरे जावे लागते. IOM
ने पूर्वीच हा मार्ग जगातील सर्वात धोकादायक असल्याचा इशारा दिला
होता.
येमेनमधील परिस्थिती :
२०१४ पासून सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे देश सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या उध्वस्त झाला आहे. एप्रिल २०२२ मध्ये
युद्धबंदी करार झाल्यानंतरही येमेन अजूनही अस्थिर आहे. सध्या देशात ३.८ लाखांहून
अधिक निर्वासित राहत आहेत.