शिवसेनेच्या दिलीप कोल्हे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

सोलापूर, दि. 2- शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतरही शिवसेना शिंदे गटात सुरू झालेली धुसपुस सोलापुरात आजही कायम असून शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह अकराजणांनी आज लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पक्ष पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षाने या मागची भूमिका लक्षात न घेतल्यास येत्या चार दिवसात आम्ही वेगळा निर्णय घेऊ,असा इशारा दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिला. कोल्हे यांच्याकडे  शिंदे सेनेचे शहर समन्वयक हे पद आहे. त्यांच्याबरोबरच उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले,वैद्यकीय सेनेचे जवाहर जाजू तसेच आशिष परदेशी सागर शिंदे, नवनाथ भजनावळे, मयूर झांबरे, राहुल काटे यांच्यासह अकरा जणांनी पक्ष पदाचे राजीनामे दिले आहेत. महेश साठे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता नवनियुक्त्या करणे, जुन्या कार्यकर्त्यांना डावलणे, पक्षात आलेल्यांना कामाची संधी न देणे असे उद्योग केले असून हे पक्ष हिताला मारक आहेत असे  कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या सामूहिक राजीनाम्याची  घोषणा केली . आपण भाजपच जाणार का असे विचारले असता येत्या चार दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन  योग्य तो निर्णय घेऊ असेही ते म्हणाले  . दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  प्रा. सावंत यांच्या राजनाम्यानंतर 11 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी  सामूहिक राजीनामे देणे  हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात असून याबाबत पक्ष काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.