सीमावर्ती भागात गव्हाचे पीक जोमात

शावळ, दि. २ -

अक्कलकोट तालुक्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या शावळ व सीमावर्ती भागात गव्हाचे पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. शावळसह कर्नाटक राज्यातील इंडी, अफझलपूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला असला तरी रात्री कडक थंडी व दिवसा ऊन अशा पोषक वातावरणामुळे या भागातील गव्हाच्या पिकाला चांगलाच फायदा होत असल्याने सध्या गव्हाचे पीक जोमात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली. यंदाच्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल बनले होते. असे असले तरी सध्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही भागात कडाक्याची थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांवर चांगला परिणाम होत आहे. तर दुसरीकडे गव्हाच्या पिकावर मावा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर वातावरणात अचानक बदल झाल्याने पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. यामुळे गव्हाच्या पिकासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण होऊन गव्हाच्या पिकाला एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे.

या परिसरातील हिळ्ळी, आंदेवाडी, बु।।, खु, कुडल, देवीकवठा, नाविंदगी, नागणसूर, हैद्रा, घुंगरेगाव, कल्लहिप्परगे, तर कर्नाटकातील इंडी, अफझलपूर तालुक्यातील गुब्ब्याड, शेषगिरी, होसूर, अगरखेड, मणूर, भुयार आदी भागातील शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. तरीसुध्दा निसर्गाच्या या संकटाला तोंड देत शेतकरी नव्या उमेदीने शेती करीत आहेत. यंदा खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने तूर, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. याची भरपाई गव्हाच्या उत्पादनातून होईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वास्तविक या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सातत्याने बसत आहे. यामुळे या परिसरातील शेती व्यवसाय संकटात येतो की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, प्रगतिशील शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग करून या व्यवसायाला चालना दिली आहे.