दी प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटाची उत्सुकता; कांतारा ऋषभ शेट्टी साकारतोय महाराजांची भूमिका

बंगळुरू : छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती केवळ
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोट्या उत्साहात साजरी केली जात आहे. परदेशातील
मराठी बांधव आपल्या लाडक्या आणि आदर्श राजाची जयंती साजरी करत आहेत. किल्ले शिवनेरीसह विविध ठिकाणी शिवजयंती
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष दिनानिमित्ताने अनेक मोठ्या
प्रकल्पांची घोषणा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर 'कांतारा' फेम
अभिनेता ऋषभ शेट्टीच्या 'दी प्राइड ऑफ भारत छत्रपती शिवाजी
महाराज' या सिनेमाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. 'दी प्राइड ऑफ भारत
छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटात ऋषभ शेट्टी हा
शिवरायांची भूमिका साकारणार आहे. गेल्यावर्षीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली
होती. त्यावेळी चित्रपटाचे एक पोस्टर देखील समोर आले होते. आता या चित्रपटाचे नवीन
पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपतींच्या भूमिकेत ऋषभ शेट्टी देवीसमोर
उभा असलेला दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सिंग यांनी हे पोस्टर
इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, 'जय भवानी! जय शिवाजी ! हर हर महादेव !! सर्वश्रेष्ठ योद्धा राजा, भारताचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या
जयंतीनिमित्त, आम्ही पहिला लूक सादर करत आहोत. यामध्ये त्या
ऐतिहासिक राजाचे सामर्थ्य आणि भक्ती दर्शवली आहे, ज्याने
संपूर्ण उपखंडाचे भाग्य बदलले. हा एक सन्मान आहे की आम्ही त्यांची असामान्य वीरता,
सन्मान आणि स्वराज्याची गाथा एका अद्वितीय टीमसह पडद्यावर आणत आहोत.'
'दी प्राइड ऑफ भारत छत्रपती
शिवाजी महाराज' चित्रपट 21 जानेवारी 2027 ला प्रेक्षकांच्या
भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदीसह कन्नड, तेलुगु,
तमिळ, मराठी, मल्याळम
आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होईल. या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अद्याप उघड करण्यात आली नाहीत. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनावरील छावा या
चित्रपटाने हिंदी पडद्यावर इतिहास घडवल्याच्या पार्श्वभूमीवर दी प्राइड ऑफ भारत
छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटाबद्दल सर्वाना उत्सुकता लागली आहे.