प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण

प्रथिनांशिवाय शरीर बनवता येत नाही. शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयव प्रथिनांनी बनलेला असतो. स्नायू, हाडे, त्वचा, केस यासह सर्व प्रकारच्या पेशींमध्ये प्रोटीन असते. प्रथिने स्वतः हिमोग्लोबिन बनवतात. ती शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजन वाहून नेतात. प्रथिनांमुळे शरीरात अनेक महत्त्वाच्या रासायनिक क्रिया घडतात. याशिवाय प्रथिनांपासून अनेक एन्झाइम्स आणि हार्मोन्स तयार होतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. कुपोषणही होते.


आयुष्य चालवण्यासाठी शरीरात दहा हजार प्रकारची प्रथिने असतात. ती महत्त्वाची असल्याने प्रथिनांची कमतरता शरीरात किती गंभीर समस्या निर्माण करू शकतात हे लक्षात येईल. दररोज आपल्याला 60 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांची कमतरता असल्यास शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात आणि आपण कुपोषणाला बळी पडतो. दररोज आपण आपल्या अन्नात किमान दहा टक्के प्रथिने घेतली पाहिजेत; पण भारतातील लोक फार कमी प्रथिने खातात. यामुळेच येथील बहुतांश लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे क्वाशिओरकोर हा कुपोषणाचा गंभीर आजार होऊ शकतो आणि यामुळे व्यक्तीला वारंवार चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो. प्रथिनांच्या कमतरतेवर उपचार न केल्यास किंवा आहारात सुधारणा न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात तसेच क्वाशिओरकर, मॅरास्मस, मानसिक आरोग्याशी संबंधित आजार, एडेमा इत्यादी आजार होऊ शकतात. प्रथिनांची कमतरता धोकादायक पातळीवर पोहोचली तर पोट, पाय, पंजे किंवा हाताला सूज येऊ लागते.

 या आजाराला एडेमा म्हणतात. प्रथिनेच शरीरात रक्ताभिसरण चालू ठेवतात. जेव्हा प्रथिनांची कमतरता असते तेव्हा रक्ताऐवजी इतर द्रव तेथे पोहोचतात. यामुळे तिथे सूज येऊ लागते. आपला मेंदू न्यूरोट्रान्समीटर रसायनांचा वापर करून पेशींना माहिती पाठवतो. न्यूरोमीटर अमिनो अ‍ॅसिडपासून बनलेले आहे, ते प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्यामुळे जेव्हा प्रथिनांची कमतरता असते, तेव्हा न्यूरोमीटर योग्यरीत्या कार्य करणार नाही आणि माहिती मेंदूद्वारे प्रसारित होणार नाही. यामुळे मूडमध्ये बदल होईल, चिडचिडेपणा येईल. त्यामुळे डोपामाइन, सेरोटोनिन हार्मोन्सही मेंदूमध्ये कमी असतील.

 केस असो की नखे किंवा त्वचा; हे सर्व इलेस्टिन, कोलेजन आणि केराटिनपासून बनलेले असतात. या तिन्ही गोष्टी प्रथिने आहेत. म्हणजेच प्रथिनांची कमतरता असल्यास केस पातळ होऊन गळू लागतात. नखे मध्यभागी तुटणे आणि फुटणे सुरू होईल. त्याच वेळी, त्वचा निस्तेज, कोरडी आणि पिवळी होऊ लागते.  शरीरात पुरेशी प्रथिने न घेतल्यास स्नायू कमकुवत होतात. यामुळे शरीराचा समतोल राखण्यात अडचण येते. वृद्धांमध्ये प्रथिनांची कमतरता असल्यास चालताना त्रास होतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे चयापचयदेखील मंदावते. यामुळे अ‍ॅनिमिया होऊ शकतो, म्हणजे शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. या सर्व कारणांमुळे शरीरात प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. काही लोकांमध्ये जखमा झाल्या तर बर्‍या होण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणजेच जर एखादी जखम सहज बरी होत नसेल तर समजून घ्या की प्रथिनांची कमतरता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोलेजन योग्यरीत्या तयार होत नाही. त्वचेच्या संयोजी ऊतकांमध्ये कोलेजन आढळते, ज्यामुळे रक्त गोठण्याची समस्या उद्भवते.