महाशिवरात्रीनिमित्त श्री सिध्दरामेश्वर मंदिरात गर्दी; सोलापूरातील सर्व शिवमंदिरात भाविकांच्या रांगा

सोलापूर : बाराव्या शतकातील महान शरण आणि सिध्दीपुरूष शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यांच्या मंदिरासह बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन, अक्कलकोट रोडवरील होटगी संस्थेतील वीरतपस्वी मंदिर, विजयपूर रस्त्यावरील श्री रेवणसिध्देश्वर या प्रमुख मंदिरांसोबतच सोलापूरातील सर्व शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त भक्तांची प्रचंड गर्दी झाली आहे. साक्षात शिवाचे अवतार म्हणून भक्तांचे श्रध्दास्थान असलेले सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यांच्या मंदिरात बुधवारी पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी झाली. सिध्दरामेश्वरांच्या योग समाधीचे दर्शन घेऊन मुख्यमंदिरातील श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागल्याचे दिसून आले. महिला आणि पुरूषांनी स्वतंत्र रांगेतून अतियश शिस्तीने दर्शन घेतल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदीर शिवभक्तांच्या गर्दीने फुलले आहे. येथील प्रसिद्ध शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्यावर दूरपर्यंत मोठी रांग लावली आहे. आज महाशिवरात्री निमित्त अक्कलकोट रस्त्यावरील होटगी संस्थेच्या वीरतपस्वी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावले आहेत. विजयपूर रस्त्यावरील श्री रेवणसिध्देश्वर मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. एक एक करून भाविकांना शिवलिंगाच्या दर्शनासाठी आतमध्ये सोडल्या जाते. भाविक मनोभावे या ठिकाणी येऊन पूजा करीत आपली श्रद्धा व्यक्त करीत आहेत.