पुरूषांमधला स्तन कॅन्सर

स्तनांच्या कर्करोगाचा संबंध कायमच महिलांशी जोडला जातो. हा विकार फक्त महिलांनाच होतो, असा सर्वसाधारण समज. अंडाशयाचा तसेच गर्भाशयाचा कॅन्सर फक्त महिलांनाच होतो कारण पुरूषांना हे अवयवच नसतात. पण पुरूषांनाही स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. पुरूषांमधल्या आणि महिलांमधल्या स्तनांच्या कर्करोगात काही मूलभूत फरक असतात. पुरूषांमधल्या स्तनांच्या कर्करोगाविषयी जाणून घेऊ...


पुरुषांना होणारा स्तनांचा कर्करोग दुर्मीळ प्रकारात मोडतो. कोणत्याही वयातल्या पुरूषांना हा विकार होऊ शकतो. स्तनांचा कॅन्सर झालेल्या पाचपैकी एका पुरूषाच्या घरात स्तनांच्या कॅन्सरचा इतिहास असतो. म्हणजे वडील, भाऊ  आदींना स्तनांचा कॅन्सर झालेला असू शकतो.

लक्षणे - स्तनांमधली गाठ हे स्तनांच्या कॅन्सरचं सर्वसाधारण लक्षण मानलं जातं. पण पुरूष याकडे फारशा गांभीर्याने पाहात नाहीत. स्तनांमधली गाठ दुखरी नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण जास्त असतं. खालच्या दिशेला वळलेली स्तनाग्रे हे सुद्धा पुरूषांमधल्या स्तनांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

 कॅन्सरग्रस्त पेशी स्तनांवरच्या अस्थिबंधनाला आपल्या बाजूला खेचून घेतात. यामुळे स्तनागे्र खालच्या बाजूला वळलेली, कोरडी तसंच शुष्क होऊ  शकतात. स्तनांमधून स्रवणारा द्रव हे सुद्धा स्तनांच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

 कर्करोगाच्या गाठींमुळे स्तनांमध्ये द्रवपदार्थ साठतात आणि स्तनाग्रांमधून ते बाहेर पडू शकतात. स्तनांवरची उघडी जखमही या कर्करोगाकडे अंगुलीनिर्देश करू शकते. कर्करोगाच्या गाठी त्वचेच्या आत गेल्याचंही हे लक्षण असू शकतं.

पुरूषांच्या स्तनांमध्ये टिश्यूंचं प्रमाण कमी असल्याने असं होतं. कर्करोग शरीरात पसरला तर स्तनांमधल्या वेदना, हाडांमधल्या वेदना, स्तनांजवळच्या ग्रंथी सुजणं अशी लक्षणं दिसू शकतात.

उपचार - शस्त्रक्रिया हा पुरूषांच्या स्तनांच्या कर्करोगावरच्या उपचारांचा पहिला पर्याय आहे. या शस्त्रक्रियेत संपूर्ण स्तन काढून टाकले जाते. तसंच दंडातल्या ग्रंथीही काढून टाकल्या जातात. यामुळे कर्करोग शरीरात पसरत नाही.

 एस्ट्रोजन हार्मोन थेरपी या उपचारपद्धतीचाही अवलंब केला जातो. काही प्रकरणांमध्ये कर्करोगग्रस्त पेशींवर, त्यांच्या भिंतींवर एस्ट्रोजन रिसेप्टर्सचं अस्तित्व असतं. अशा परिस्थितीत एस्ट्रोजनमुळे पेशी विभागतात आणि त्यांची वाढ होते. हार्मोन थेरपीमुळे एस्ट्रोजनच्या प्रभावावर परिणाम होतो आणि वाढीचं प्रमाण मंदावतं.

 कर्करोगग्रस्त पेशींवर रिसेप्टर्स नसतील तर हार्मोन थेरपीचा काहीच उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत केमोथेरपीद्वारे उपचार केले जातात.

प्रतिबंध कर्करोगाचं वेळेत निदान हाच याचा प्रतिबंध आहे. घरात पुरूषांच्या स्तनांच्या कॅन्सरचा इतिहास असेल तर स्तनांची नियमित तपासणी हा प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो. यासोबतच आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब, नियमित व्यायाम, पोषक आहार यामुळे पुरूषांमधल्या स्तनांच्या कॅन्सरला आळा बसू शकतो.

वैष्णवी कुलकर्णी