तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांत 100% फी माफी
पुणे : तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या सन्मान आणि
सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व
सार्वजनिक विद्यापीठांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे १०० टक्के शैक्षणिक शुल्क
माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध
करण्यात आला आहे. या निर्णयानुसार तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क
विद्यापीठांनी स्वनिधीतून भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाजातील प्रत्येक
घटकाला शिक्षणाची समान संधी मिळावी आणि तृतीयपंथी समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
येऊन स्वाभिमानाने पुढे जावा, या उद्देशाने सरकारने हे पाऊल
उचलले आहे.
तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांवर
होणारे हिंसाचार, भेदभाव आणि छळ यांसारख्या प्रकारांना आळा
घालण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांची
अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या संलग्न महाविद्यालयांना
परिपत्रकाद्वारे सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच या सूचनांची
महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी होत आहे की नाही याचा नियतकालिक आढावा घेण्याचे
निर्देशही देण्यात आले आहेत. विद्यापीठांनी या आढाव्याची नोंद त्यांच्या वार्षिक
अहवालात करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
प्रवेश अर्जात ‘तृतीयपंथी’ पर्याय
तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी प्रवेश अर्जांमध्ये ‘तृतीयपंथी’ हा स्वतंत्र लिंग पर्याय उपलब्ध करून
देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एखादा विद्यार्थी तृतीयपंथी आहे या कारणावरून
त्याला विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयात प्रवेश नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर
राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय मोठा आधार ठरणार असल्याचे शिक्षण
क्षेत्रातून सांगितले जात आहे.