मुंबई विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; 80 एफआयआर, 13 चालकांवर गुन्हे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. पोलीसानी परदेशी आणि देशांतर्गत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळणाऱ्या चालकांविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत अशा प्रकारच्या तब्बल ८० एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच १३ टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय १३ टॅक्सी जप्त करण्यात आल्या असून अनेक चालकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.

प्रवाशांकडून जादा भाड्याची मागणी

२ मार्च रोजी घडलेल्या एका घटनेत २८ वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक करून त्याच्याकडून अधिक भाडे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रवासी भुवनेश्वरहून पहाटे १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उतरला होता. रिक्षा चालकाने सेवन हिल्स रुग्णालयापर्यंत मीटरनुसार भाडे घेण्याचे मान्य केले. मात्र नंतर त्याने प्रवाशाकडून ५०० रुपयांची मागणी केली आणि पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रवाशाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रकाश शेट्टी  (वय ४२) या रिक्षा चालकाला अटक केली आणि त्याचा परवाना रद्द करण्यात आला.

पोलिस अधिकाऱ्यांनाही धमकी

यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी पहिली एफआयआर नोंदवण्यात आली होती. एका महिला पोलिस अधिकाऱ्यांनी प्रवासी असल्याचे भासवत कुलाब्यासाठी टॅक्सीने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी टॅक्सी चालकाने १७०० रुपयांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी वैभव  भोसले  (वय ३४) या टॅक्सी चालकाला अटक केली. एएसआय Smita Pednekar टॅक्सीत बसल्यानंतर चालकाने त्यांना धमकी देत आरडाओरड केल्यास आणखी ३५० रुपये द्यावे लागतील असे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. या दोन प्रकरणांनंतर पोलिसांनी विमानतळ परिसरातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर विशेष मोहीम सुरू केली असून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.