श्रीगोंद्यात धक्कादायक घटना; तरुणीसमोरच २५ वर्षीय बँक कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीगोंदा : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन तरुणीसमोरच २५ वर्षीय बँक कर्मचारी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरात ३ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

सागर सखाराम निंबाळकर (वय २५, रा. श्रीगोंदा स्टेशन) असे मृत तरुणाचे नाव असून तो जिल्हा सहकारी बँकेत नोकरी करत होता. मंगळवारी दुपारी सागर निंबाळकर हा शिवाजीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सागर आणि त्या तरुणीमध्ये काही वेळ संभाषण झाल्यानंतर अचानक शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्यानंतर सागरने टोकाचे पाऊल उचलत खोलीत असलेल्या कपडे वाळत घालण्याच्या दोरीचा वापर करून तरुणीसमोरच गळफास घेतला. ही घटना अचानक घडल्याने तरुणी घाबरून गेली आणि तिने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सागरला तातडीने उपचारासाठी श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी मयताचा नातेवाईक किरण तुकाराम निंबाळकर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सागरने आत्महत्या का केली, प्रेमसंबंधातील वादामुळे हा प्रकार घडला की इतर काही कारण आहे का, याबाबत शहरात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र या घटनेमागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.