ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन; पर्यावरण चळवळीला मोठा धक्का

पुणे :-  भारतामधील पर्यावरण चळवळीचे अग्रणी आणि ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. ही माहिती त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी निवेदनाद्वारे दिली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पश्चिम घाटांसाठी आयुष्यभर लढा डॉ. माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर भारतातील पर्यावरणीय संवर्धनासाठी, विशेषतः पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. पश्चिम घाटांमध्ये होत असलेल्या अनियंत्रित विकासकामांमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका त्यांनी सर्वप्रथम अधोरेखित केला. २०११ साली त्यांनी तयार केलेला गाडगीळ अहवाल हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. या अहवालाने विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला होणाऱ्या हानीकडे देशाचे लक्ष वेधले.

UNEP ‘Champion of the Earth’ पुरस्कार

डॉ. गाडगीळ यांच्या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्रांनी घेतली होती. त्यांना २०२४ साली UNEP चा ‘Champion of the Earth’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
UNEP च्या निवेदनात त्यांचा गौरव करताना, हार्वर्ड विद्यापीठापासून भारत सरकारच्या उच्चपदांपर्यंतचा प्रवास असूनही, त्यांनी स्वतःला नेहमी ‘जनतेचा वैज्ञानिक’ म्हणूनच पाहिले”, असे नमूद करण्यात आले होते.

नैसर्गिक आपत्तींविषयी इशारा

२०२१ साली पूर, ढगफुटी आणि दरड कोसळण्यासारख्या घटनांबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे मांडली होती. पश्चिम घाट आणि हिमालयातील भौगोलिक रचनेमुळे या भागांमध्ये आपत्तींचा धोका अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

गाडगीळ समितीचा अहवाल

डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पश्चिम घाट तज्ज्ञ समितीने सुमारे १.२९ लाख चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची शिफारस केली होती. मात्र काही राज्यांनी या अहवालावर आक्षेप घेतले. नंतर कस्तुरीरंगन समितीने क्षेत्र मर्यादित केले, तरीही आजपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. २०२४ साली केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या दरड दुर्घटनेत २५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गाडगीळ अहवालाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

पर्यावरण क्षेत्रात अपूरणीय क्षती

डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने देशातील पर्यावरण संवर्धन चळवळीला मोठा धक्का बसला असून, पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये शोककळा पसरली आहे.