किडनी रॅकेटचे धागेदोरे सोलापूरपर्यंत; रामकृष्णच्या माया-जाळ्याने पोलिस सतर्क
सोलापूर / चंद्रपूर : किडनी
रॅकेटचे कनेक्शन सोलापूरपर्यंत पोहोचल्यानंतर सोलापूर पोलिस यंत्रणा सतर्क झाली
आहे. आरोपी रामकृष्ण उर्फ कृष्णा सुंचू याने गोड बोलून सोलापुरात कुणाला फसवले आहे
का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणानंतर रामकृष्णने विविध ठिकाणी आपली
‘माया’ कमावल्याची चर्चा सुरू असून, सोलापुरात त्याने तब्बल
२० एकर जमीन घेतल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. न्यायालयाने
त्याच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. रामकृष्ण हा बाहेरून शांत व
संयमी स्वभावाचा दिसत होता. तो फारसा कुणाशी बोलत नसे आणि आपल्याबाबत जास्त माहिती
बाहेर जाणार नाही, याची काळजी घेत असे. तो अलिशान कारमधून
फिरत असला तरी स्वतःच वाहन चालवत होता. कोणालाही ड्रायव्हर ठेवलेला नव्हता. जर
कुणाचे काम असेल तर तो त्याला आपल्या पतसंस्थेत बोलावत असे आणि काही मिनिटांतच
बोलून पाठवत असे.
धार्मिक कार्यातून निर्माण केले विश्वासाचे वातावरण
सोलापुरातील जुनी विडी घरकुल परिसरातील वैष्णवी देवी मंदिराच्या
जीर्णोद्धारासाठी त्याने ५० लाखांहून अधिक रक्कम दिल्याची माहिती नागरिकांनी दिली
आहे. त्याठिकाणी कोनशिलाही आहे. तसेच अशोक चौकात काही दिवसांपूर्वी झालेल्या
धार्मिक विधीसाठी त्याने लाखो रुपयांची मदत केल्याचे सांगण्यात येते. धार्मिक
कार्यक्रमांवर अमाप पैसा खर्च करत असल्यामुळे त्याच्याबाबत कुणीही संशय व्यक्त
करण्याचे धाडस करत नव्हते.
व्यवसायाची बनावट ओळख
आपल्या उत्पन्नाबाबत विचारले असता, तो
हैदराबादमध्ये हॉटेल व्यवसाय असल्याचे सांगत असे. तर जवळच्या लोकांना परदेशात
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आयात-निर्यात व्यवसाय करतो, असे तो
सांगत होता.
किडनी डोनर कम्युनिटीचा वापर
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चंदीगड
येथून अटक करण्यात आलेला हिमांशू भारद्वाज याने ‘किडनी डोनर कम्युनिटी’ या फेसबुक
ग्रुपच्या माध्यमातून देशभर एजंटांचे जाळे उभे केले होते. कथित डॉक्टर कृष्णा उर्फ
रामकृष्ण सुंचू हा महाराष्ट्रातील प्रमुख एजंट होता. गरजू लोकांना हेरून त्यांना
किडनी विक्रीसाठी बाध्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध
सुरू आहे.
रामकृष्ण सुंचू याची पोलिस कोठडी गुरुवारी संपली होती.
मात्र, तो तपासात सहकार्य करत नसल्याने तपास अधिकाऱ्यांनी दहा दिवसांची वाढ
मागितली. न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.
फरार सावकार मनीष घाटबांधे याला २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कंबोडिया दौरा आणि व्हायरल व्हिडीओ
रोशन कुळे हा फेसबुकवरील किडनी डोनर कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून
डॉक्टर कृष्णाच्या संपर्कात आला होता. तो कृष्णा, भारद्वाज
आणि इतरांसह कंबोडियाला गेला होता. त्यापैकी दोघांना एसआयटी पथकाने अटक केली असून,
एक अभियंता फरार आहे. कंबोडियाला जातानाचा विमानतळावरील व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातील सर्व व्यक्तींची
माहिती पोलिस गोळा करत आहेत.
दरम्यान, कृष्णा आणि भारद्वाज यांनी किडनी विक्री
केलेल्या काही व्यक्तींची नावे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. तसेच
कंबोडियाला जाण्यापूर्वी कोलकाता येथील पॅथॉलॉजीमध्ये तपासणीसाठी प्रिस्क्रिप्शन
देणारा डॉक्टर कोण, याचाही शोध सुरू असून संबंधित कागदपत्रे
मागविण्यात आली आहेत.