लाल किल्ला स्फोट प्रकरणात आरोपी उमरचा पहिला फोटो समोर; पार्किंगमध्ये तीन तास कारमध्ये बसून राहिला.

दिल्ली: लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्यामागे असल्याचा संशय असलेला दहशतवादी उमर मोहम्मदचा पहिला फोटो समोर आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधून उमर आणि आमिर या दोघांना काल रात्री अटक करण्यात आली असून त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू आणि २४ जण जखमी झाले होते. स्फोटासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची हुंडाई i20 कार पार्किंगमध्ये सुमारे तीन तास उभी होती, आणि या काळात उमर कारमध्येच बसून होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमर काळा मास्क घालून कारच्या आत बसलेला दिसतो. पोलिसांच्या माहितीनुसार, तो हल्ला कधी आणि कसा करायचा याबाबत सूचनांची वाट पाहत होता. स्फोटानंतर मिळालेल्या पुराव्यांवरून पोलिसांनी सांगितले की, उमर हा हरियाणातील फरीदाबाद मॉड्यूलचा भाग असण्याची शक्यता आहे. काल जम्मू-काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद ते लखनौदरम्यानच्या कारवाईत २,९०० किलो संशयित अमोनियम नायट्रेट जप्त केले, ज्याचा या स्फोटाशी संबंध असू शकतो, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी UAPA (बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा यंत्रणांनी आत्मघातकी हल्ल्याच्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. अधिकृत प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे.