सूरज चव्हाणचा स्वप्नपूर्ती गृहप्रवेश; ‘बिग बॉस’ विजेत्याने घेतला नव्या घराचा ताबा
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरांत
पोहोचलेलं नाव म्हणजे सूरज चव्हाण. गुलीगत किंगचा झापुक झुपूक अंदाज, प्रामाणिक खेळ आणि लोकांशी जोडणारी त्याची शैली पाहून प्रेक्षकांनी त्याला
विजेतेपद बहाल केले. बिग बॉसनंतर त्याचा लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने वाढला.
शोनंतर सूरजने एक स्वप्न जपलं होतं—हक्काचं स्वतःचं घर. अखेर हे स्वप्न आता वास्तवात उतरलं आहे.
नुकताच सूरजने आपल्या नव्या घराचा गृहप्रवेश विधी पूर्ण केला असून
त्याचा सुंदर व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहते त्याच्यावर
प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
आई-वडिलांचे छत्र नसलं… तरी संघर्षातून उभा राहिलेला विजेता
सूरजचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणीच आई-वडिलांचा आधार हरवल्यानंतर
अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने दिवस काढले. अनेक संकटांना तोंड देत, स्वतःचा
मार्ग स्वतःच तयार करत तो आज लाखो चाहत्यांच्या मनात आहे. "गुलीगत धोका"
या रील्समुळे सोशल मीडियावर त्याचा फॅनबेस जबरदस्त वाढला.
बिग बॉसमुळे त्याचे आयुष्य जवळपास बदलून गेले. शो संपताना सूरजने
ठामपणे सांगितले होते की, “सर्वात आधी गावी जाऊन माझं स्वतःचं घर बांधणार.” आज
तो शब्द खरा झाला.
अजित पवारांनी दिलेला शब्द आणि सूरजचा गृहप्रवेश
बारामतीचा सुपुत्र असलेल्या सूरजला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी लवकरात लवकर हक्काचं घर मिळवून देण्याची हमी दिली होती. त्यांच्या
आश्वासनानंतर सूरजच्या घराचं काम वेगाने पूर्ण झाले आणि अखेर तो दिवस उगवला—सूरजने
नव्या घरात विधिपूर्वक गृहप्रवेश केला.
याचबरोबर त्याच्या लग्नाची लगबगही सुरू असल्याची माहिती मिळते आहे.
लग्नाआधी नवीन घर मिळाल्यामुळे तो अधिकच आनंदी दिसत आहे.
चाहत्यांचा भावनिक प्रतिसाद
सूरजच्या गृहप्रवेशाच्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
एका चाहत्याने लिहिलं—
“आई जगदंबेच्या करपेने सर्व काही ठीक झालं, देवाच्या परीक्षेत तू पास झालास. अभिमान वाटतो.”
तर दुसरा म्हणतो—
“नशिबात लिहिलेलं कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही.”
सूरज चव्हाणच्या नव्या सुरुवातीबद्दल चाहते आणि मित्रमंडळी मनापासून
शुभेच्छा देत आहेत.