हातावरील निळ्या जखमांमुळे चर्चेत ट्रम्प; तब्येतीवर स्वतः दिले स्पष्टीकरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी ते त्यांच्या तब्येतीमुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. ७९ वर्षीय ट्रम्प यांच्या हातांवर अलीकडेच निळसर जखमा दिसून आल्याने त्यांच्या आरोग्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या चर्चांना आता ट्रम्प यांनी स्वतः पूर्णविराम दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवणारे दुसरे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. हातांवरील निळ्या डागांमुळे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान ते झोपले असल्याच्या दाव्यांमुळे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चा रंगली होती. आपण एकदम फिट आहोत,” असे ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हातांवर दिसणारे निळे डाग कोणत्याही अपघातामुळे किंवा गंभीर आजारामुळे नाहीत, तर दररोज घेत असलेल्या ॲस्पिरिन औषधामुळे असल्याचे त्यांनी सांगितले.

तब्येतीबद्दल काय म्हणाले ट्रम्प?
द वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपल्या आरोग्याविषयी स्पष्ट भूमिका मांडली. माझी तब्येत पूर्णपणे ठीक आहे, असे सांगत त्यांनी वारंवार होणाऱ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या हातांवरील जखमा आणि सुजलेले घोटे याबाबत अलीकडच्या काळात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 
रक्त पातळ ठेवण्यासाठी मी दररोज ॲस्पिरिन घेतो. त्यामुळे हातांवर अशा खुणा दिसतात, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. “माझ्या हृदयातून चांगले, पातळ रक्त वाहायला हवे, म्हणून मी हे औषध घेतो,” असेही त्यांनी सांगितले.

कशामुळे होतात जखमा?
आपल्या प्रकृतीबाबत वारंवार प्रश्न विचारले जात असल्याने ट्रम्प यांनी उपरोधिकपणे प्रतिक्रिया दिली. “चला, आता तब्येतीबद्दल २५ व्यांदा बोलूया,” असे ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला. 
हाताला दुखापत झाल्यास मी मेकअप किंवा पट्टी लावतो, असे सांगत त्यांनी जखमांबद्दल मोकळेपणाने माहिती दिली. एका प्रसंगी हाय-फाइव्ह देताना ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या अंगठीमुळे हाताच्या मागील बाजूला जखम झाल्याचेही त्यांनी सांगितले.

भरसभेत लागली झोप?
सार्वजनिक मंचावर आणि ओव्हल ऑफिसमधील बैठकीत ट्रम्प झोपले असल्याचे दावेही करण्यात आले होते. मात्र हे सर्व दावे त्यांनी फेटाळून लावले. “मला कधीच जास्त झोप येत नाही. मी फक्त डोळे बंद करतो, कारण causes मला ते आरामदायी वाटतं,” असे ट्रम्प म्हणाले.

विशेष म्हणजे, याच मुद्द्यावरून ट्रम्प यांनी यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची “स्लीपी” म्हणून खिल्ली उडवली होती. त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांना राजकीय रंगही चढलेला दिसत आहे.