"माझे पप्पा मला सोडून गेले" चिमुकलीची आर्त हाक; अमित ठाकरेही गहिवरले

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक ठरली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सोलापूर शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सरवदे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. मात्र, या भेटीदरम्यान बाळासाहेब सरवदे यांच्या लहान मुलीचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

माझे पप्पा मला सोडून गेले…” असे म्हणत ती चिमुकली ढसाढसा रडत होती. वडिलांच्या आठवणीने कोलमडून पडलेल्या मुलीला धीर देण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करत होते, मात्र या दृश्याने तेही निःशब्द झाले. या हृदयद्रावक क्षणांचे काही जणांकडून व्हिडिओ चित्रीकरण केले जात असल्याचे अमित ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सर्वांना घराबाहेर पाठवले. तरीही यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून सर्वत्र तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

अमित ठाकरे यांचा संतप्त सवाल

कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “राजकारणाची पातळी इतक्या खालच्या थराला गेली आहे की आता निवडणुकांसाठी लोकांचा खून होत आहे. पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला लावणं वेगळं आणि थेट हत्या करणं वेगळं.” अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात येऊन परिस्थिती पाहावी, अशी मागणी केली. अशा निवडणुका असतील तर आम्हाला निवडणुका नकोत. आम्ही सगळे अर्ज परत घेतो, तुम्ही जिंका. पण महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण करू नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

न्यायाची ठाम मागणी

मी कुणाच्या मृत्यूचे राजकारण करायला इथे आलेलो नाही. पण एक आई, एक पत्नी आणि दोन मुली आज अस्थी विसर्जन करून आल्या आहेत. कशासाठी? निवडणुकांसाठी? याची उत्तरं मला हवीत,” असे म्हणत
बाळासाहेब सरवदे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम मागणी अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या घटनेनंतर सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण असून, पोलीस तपास सुरू आहे. निवडणूक काळातील वाढती हिंसा हा गंभीर प्रश्न बनत चालल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.